वर्धा: शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती 08 डिसेंबर 2019 रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार आहे. या करिता प्रशासनाने व विभाग प्रमुखाने आपआपल्या जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाला नियोजन देण्याकरिता सुचना द्याव्या अश्या मागणीचे लेखी पत्र वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष श्री. रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी आयुक्त महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांना दिले.
संत जगनाडे महाराज यांचे महान कार्य व अमूल्य योगदान लक्षात घेऊन शासकीय पध्दतीने त्यांची जयंती साजरी व्हावी म्हणून शासनाकडे माझा सतत पाठपुरावा होता.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मागणी पुर्ण करुन 26 डिसेंबर 2018 रोजी सामान्य प्रशासन विभाामार्फत शासन परिपत्रक निर्गमीत केले. यानुसार प्रथमच 08 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत जगनाडे महाराज साजरी होणार आहे. ही संपुर्ण महाराष्ट्रा करिता अत्यंत गौरवाची व समाधानाची बाब आहे असे मत यावेळी खासदार रामदास तडस यंानी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी आयुक्त महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांना दिलेल्या पत्रानुसार संपुर्ण महाराष्ट्र निश्चीतच संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होईल या करिता महाराष्ट्रातील तमाम जनतेने या महत्वपुर्ण क्षणी प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन देखील खासदार रामदास तडस यांनी याप्रसंगी केले.